उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच कोरोना आला; नारायण राणे


रत्नागिरी – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असून भाजप नेते नारायण राणे यांनी या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले, पण राज्यातील जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि कोरोना आला, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

नारायण राणे यांनी ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. सरकारची वर्षपूर्ती झाली. पण राज्यातील जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच कोरोना आला. हा त्यांचा पायगुण असून कोरोना आला आणि संपूर्ण राज्यात हाहाकार उडाला. महाराष्ट्राचा गेल्या वर्षभरात कोणत्याच क्षेत्रात अव्वल नंबर आला नाही. एवढी महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. पण कोरोनामुळे एकट्या महाराष्ट्रात 50 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची टीकाही त्यांनी केली.

नारायण राणे यांनी यावेळी बोलताना सरकारवर कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचे आरोप लावले आहेत. हे सरकार कोरोनावर उपाय योजना करण्यात अपयशी ठरले आहे. राज्यात कोरोनाच्या नावाखाली 3 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. ठाकरे सरकार निकम्मे असून काहीच कर्तृत्व त्यांनी केलेले नाही. महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे काम या सरकारने केल्याचे टीकास्त्र राणेंनी सोडले.