कोव्हिशिल्ड लसीबाबत चेन्नईतील स्वयंसेवकाचा धक्कादायक दावा


नवी दिल्ली – चेन्नईतील एका व्यक्तीत कोविड प्रतिबंधक लस टोचल्यानंतर गंभीर लक्षणे दिसून आल्याच्या प्रकरणी भारतीय औषध महानियंत्रक व संस्थात्मक नैतिकता समिती चौकशी करीत असून सीरम इन्स्टिटय़ूटने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीचा डोस घेतलेल्या चेन्नईतील चाळीस वर्षीय उद्योग सल्लागार स्वयंसेवकात मेंदू आजाराची गंभीर लक्षणे दिसून आल्याचे या स्वयंसेवकाने संबंधित संस्थांना जारी केलेल्या नोटिसीत म्हटले आहे.

हा प्रकार तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत झाला असून पाच कोटी रुपये भरपाई या व्यक्तीने मागितली आहे. मेंदूविषयक आजार व मानसिक आजाराची गंभीर लक्षणे लसीचा डोस घेतल्यानंतर या स्वयंसेवकाला आढळून आली आहेत. चेन्नई येथील श्री रामचंद्र इन्स्टिटय़ूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेत त्याला १ ऑक्टोबर रोजी लस देण्यात आली होती. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेला स्वयंसेवकाच्या कायदेशीर सल्लागाराने नोटीस दिली असून त्यात भारताचे महाऔषध नियंत्रक, केंद्रीय औषध नियंत्रण संस्था, एस्ट्राझेनेकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑक्सफर्ड लस चाचणी उपक्रमाचे प्रमुख संशोधक अँड्रय़ू पोलार्ड, श्रीरामचंद्र हायर एज्युकेशन अँड रीसर्च या संस्थेचे कुलगुरू यांनाही प्रतिवादी केले आहे.

दरम्यान ५ कोटी रुपये भरपाई या स्वयंसेवकाने मागितली आहे. त्याचबरोबर लस चाचण्या, उत्पादन व वितरण यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याबाबत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी सांगितले की, जर असे काही दुष्परिणाम संबंधित व्यक्तीमध्ये झाले असतील व त्याचा लस देण्याशी काही संबंध असेल तर त्याची वैज्ञानिक पद्धतीने चौकशी केली जाईल. जर यात घाईने चौकशी केली तर चुकीचे निष्कर्ष हाती येतील. याबाबत संस्थात्मक नैतिक समिती व महाऔषध नियंत्रक चौकशी करतील.

भारतीय औषध महानियंत्रकांनी सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाला ११ सप्टेंबरला दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पुढील आदेशापर्यंत थांबवण्यास सांगितले होते, कारण वेगळ्याच आजाराची लक्षणे एका स्वयंसेवकात दिसल्यानंतर ब्रिटनमधील एस्ट्राझेनेका कंपनीनेही चाचण्या थांबवल्या होत्या. अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केलेल्या लशीची निर्मिती भारतात सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया कोव्हिशिल्ड नावाने करीत आहे.

सीरमला या चाचण्या पुढे सुरू करण्यास १५ सप्टेंबरला परवानगी देण्यात आली होती. विधि आस्थापनेने २१ नोव्हेंबरला दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, आमच्या अशिलास (स्वयंसेवक) भरपाई मिळाली पाहिजे. कारण त्यांच्या कुटुंबीयांना त्यामुळे बराच त्रास सहन करावा लागत आहे. सदर स्वयंसेवक अजूनही गंभीर आजारातून बरा झालेला नाही. वैद्यकीय उपचार त्याच्यावर चालू असून बराच काळ ते करावे लागणार असल्यामुळे नोटिस मिळताच दोन आठवडय़ात पाच कोटी रुपये भरपाई देण्यात यावी.

येथील चाळीस वर्षीय स्वयंसेवकाच्या मेंदू कार्यात सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोव्हिशिल्ड लस घेतल्याने बिघाड झाल्याचे त्याच्या तक्रारीत म्हटले आहे. सदर व्यक्तीची आकलन-बोधन क्षमता कार्येही या लशीमुळे बिघडल्याची तक्रार आहे. या स्वयंसेवकाच्या म्हणण्यानुसार त्याला आता एन्सेफलोपॅथीचा त्रास होत असून त्याच्या मेंदूवर दुष्परिणाम झाले आहेत. हे परिणाम लस घेतल्यानंतरच झाले असून ही लस सुरक्षित नाही. त्याचा इलेक्ट्रोएन्सेफलोग्राम म्हणजे इइजी काढण्यात आला असता त्याच्या मेंदूतील दोन्ही अर्धगोलार्धात काही प्रमाणात बिघाड झाल्याचे दिसून आले.

या व्यक्तीच्या मानसरोग मूल्यमापनात बोलण्यात व दृश्य स्मृतीत बिघाड झाल्याचे दिसून आले. आता त्याची बोधन क्षमता कमी झाली आहे. मानसिक व मेंदूरोगाच्या परिणामांना त्याला सामोरे जावे लागले असल्याचे कायदेशीर नोटिशीत म्हटले आहे. ब्रिटनमधील अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केलेल्या लशीचीच कोव्हिशिल्ड ही लस आवृत्ती आहे. या लसीच्या परदेशातील चाचण्यात एका स्वयंसेवकास ‘ट्रान्सव्हर्स मायलेटिस’ आजाराची लक्षणे दिसली होती. त्यात मेरुरज्जूत बिघाड होऊन तो ३ ते ६ महिने किंवा कायमही राहतो, पण हा आजार त्या व्यक्तीस लशीमुळे झाला नसल्याचे सांगून त्यावेळी काही काळ बंद केलेल्या चाचण्या पुन्हा सुरु करण्यात आल्या होत्या.