या भन्नाट ट्रिकमुळे WhatsAppवर समोरच्याला कळणार नाही तुम्ही त्याचे स्टेटस पाहिलेले


मुंबई : 2018 मध्ये स्टेटस फिचर इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअॅपने लाँच केले होत. हे फिचर सुरुवातीला अनेकांना आवडले नाही, परंतु हे फिचर आता अनेकांचे सर्वात आवडते फिचर बनले आहे. या फिचरचा वापर लोक त्यांच्या भावना शेअर करण्यासाठी करु लागले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप युजर्स फोटो, व्हिडीओ किंवा टेक्स्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत असतात. तर या फिचरचा वापर करुन हल्ली लोकांनी व्यवसायदेखील सुरु केले आहेत. स्टेटस अपलोड केल्यानंतर पुढील 24 तास हे स्टेटस तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर दिसते. त्यानंतर आपोआप रिमूव्ह होते.

अनेकदा एखाद्या युजरचे स्टेटस आपल्याला पाहायचे असते, परंतु आपण त्याचे स्टेटस पाहिले हे त्या व्यक्तीला कळू द्यायचे नसते. पण तसे अनेकांना करता येत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत, ज्याद्वारे कोणाचेही स्टेटस तुम्ही पाहू शकता आणि त्या व्यक्तीला तुम्ही स्टेटस पाहिले हे देखील कळणारही नाही, की आपण त्याचे स्टेटस पाहिले आहे.

जर लोकांचे स्टेटस तुम्हाला पाहायचे असेल आणि ते समोरच्या व्यक्तीला हे कळू द्यायचे नसेल तर तुम्हाला व्हॉट्सअॅपवरील Read receipts फिचर टर्न ऑफ करावे लागेल. Read receipts बंद करण्यासाठी व्हॉट्सअॅप प्रायव्हसी सेटिंग्समध्ये जा आणि तिथे Read receipt चा टॉगल दिसेल तो बंद करा. असे केल्यानंतर तुम्ही कोणाचेही स्टेटस पाहिल्यानंतर त्या व्यक्तीच्या स्टेटस व्ह्यू लिस्टमध्ये तुमचे नाव दिसणार नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला कळणारच नाही की, तुम्ही त्याचे स्टेटस पाहिले आहे.

दरम्यान, तुम्ही या फिचरचा वापर करत असताना जेव्हा कोणालाही मेसेज कराल तेव्हा त्या व्यक्तीने तुमचा मेसेज वाचला आहे की नाही हे तुम्हाला समजणार नाही. कारण Read receipt चा पर्याय बंद ठेवल्याने तुम्हाला मेसेजखाली दिसणारी ब्लू टिक दिसणार नाही. तसेच कोणत्याही युजरने जर तुम्हाला मेसेज पाठवला असेल आणि तुम्ही तो वाचला, तरीदेखील त्या युजरला कळणार नाही की तुम्ही त्याचा मेसेज वाचला आहे आणि त्यालाही ब्लू टिक दिसणार नाही. त्यामुळे जसा या Read receipts ट्रिकचा आपल्याला फायदा होतो, तसा हे पर्याय बंद ठेवल्यास आपला तोटादेखील होणार आहे.