२०२४ मध्ये पुन्हा व्हाईट हाउस मध्ये येण्यासाठी ट्रम्प यांची तयारी

फोटो साभार सीएनएन

अमेरिकेच्या २०२० च्या अध्यक्षपद निवडीत ट्रम्प यांना पराभव पत्करावा लागला असला तरी त्यामुळे नाउमेद न होता ट्रम्प यांनी २०२४ मध्ये पुन्हा एकदा अध्यक्ष होऊन व्हाईट हाउस मध्ये प्रवेश करण्याची तयारी सुरु केली आहे. अमेरीकन मिडीयानुसार जो बायडेन ज्या दिवशी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत त्याच दिवशीपासून ट्रम्प पुढच्या निवडणूक मोहिमेची सुरवात करणार आहेत.

या संदर्भात ट्रम्प यांनी त्याच्या विश्वासू सल्लागारांबरोबर व्हाईट हाउस मध्ये एक दीर्घ सभा घेतली असल्याचे समजते. ट्रम्प यांच्या सर्व सल्लागारांनी त्यांना २०२४ मध्ये विजयी होण्याची शक्यता खूप अधिक असल्याचे सांगितले आहे. ट्रम्प सध्या करत असलेल्या २०२४ च्या निवडणूक मोहिमेच्या तयारीतून त्यांनी त्याचा पराभव हा बेईमानी करून केला गेल्याचे संदेश दिले आहेत.

या संदर्भात झालेल्या सर्व्हेक्षणातून रिपब्लिकन पार्टीचे २/३ समर्थक ट्रम्प यांच्या दाव्याशी सहमत असल्याचे दिसून आले आहे. सेव्हन लेटर इनसाईट नावाच्या संस्थेने सुद्धा असे एक सर्व्हेक्षण करून ट्रम्प २०२४ ची निवडणूक लढले तर ६६ टक्के रिपब्लिकन त्यांना मते देतील असा अहवाल दिला आहे. ट्रम्प समर्थकांच्या मते बायडेन अध्यक्ष झाले तरी ट्रम्प हेच प्रामुख्याने चर्चेत राहणार आहेत. विशेष म्हणजे बायडेन जे निर्णय घेऊ पाहतील त्यात खोडे घालण्यासाठी ट्रम्प यांनी अगोदरच त्याचे समर्थक महत्वाच्या जागांवर नियुक्त केले आहेत यामुळे बायडेन यांना देशात सत्ता चालविणे अवघड बनेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.