मोदींच्या निवासस्थानी आणि ताफ्याच्या रक्षणासाठी स्वदेशी ड्रोन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर अनेक अवघड आणि दीर्घकाळ प्रलंबित राहिलेले देश हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे शत्रू तसेच अनेक दहशतवादी संघटनांच्या हिट लिस्ट मध्ये मोदी यांचा समावेश आहे. अश्या परिस्थितीत पंतप्रधानांचे निवासस्थान आणि त्यांचा वाहन ताफा सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी अँटी ड्रोन सिस्टीमचा वापर केला जाणार आहे.

डीआरडीओने अँटीड्रोन सिस्टीम साठी स्वदेशी तंत्रज्ञान वापरले असून त्याचा विकास आणि उत्पादनाची जबाबदारी भारत इलेक्ट्रोनिक्स कडे सोपविली आहे. सुरक्षा दलांसाठी ही प्रणाली तयार केली गेली होती आणि आता पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तिचा वापर होणार आहे.

पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी आंतरराष्ट्रीय सीमा पार करून जम्मू काश्मीर मध्ये शस्त्रे पाठवित असून त्यासाठी चीनच्या व्यावसायिक ड्रोनचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. त्याला पाक लष्कर मदत करत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर ड्रोन माध्यमातून हल्ला होण्याचा धोका आहे. त्यामुळे डीआरडीओने दोन प्रकारचे ड्रोन तयार केली आहेत. त्यात एक ड्रोन शत्रूचे ड्रोन निष्क्रीय करण्याचे काम करते तर दुसरे ड्रोन शत्रूचे ड्रोन पाडण्याचे काम करते.

या दोन्ही ड्रोनना रडार क्षमता आहे. त्यामुळे २-३ किमी परिसरात आलेली शत्रूची ड्रोन ते रोखू शकतात, पाडू शकतात. चीनी ड्रोनची क्षमता १० किलो वजनाची शस्त्रे अथवा अमली पदार्थ वाहून नेण्याची आहे. त्याला भारतीय ड्रोन चोख उत्तर देतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.