नवनिर्वाचित अध्यक्ष बायडेन यांच्या पायाला फ्रॅक्चर

फोटो साभार ई ऑनलाईन

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले असल्याचे वृत्त आहे. यामुळे पुढचे काही दिवस बायडेन आधाराशिवाय चालू शकणार नाहीत असेही समजते. रविवारी बायडेन त्यांच्या मेजर नावाच्या पाळीव कुत्र्याशी खेळत असताना तोल जाऊन पडले आणि त्यातून त्यांच्या पायाला दुखापत झाली. सध्याचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी बायडेन याना लवकर बरे व्हा अश्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बायडेन यांचे खासगी डॉक्टर केविन ओ कॉर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार बायडेन यांना दुखापत झाली त्यावेळी त्यांच्या पायात लचक भरली असावी असे वाटत होते. एक्सरे मशीन मध्ये फ्रॅक्चर दिसले नव्हते पण सिटी स्कॅन केला तेव्हा पायात बारीक फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले. ७८ वर्षीय बायडेन यांच्यावर नेवार्क मध्ये तज्ञ डॉक्टर्सच्या देखरेखीखाली एक तास उपचार केले गेले.

नवीन वर्षात २० जानेवारीला बायडेन अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी त्यांच्या मंत्र्यांच्या निवडीचे काम वेगाने सुरु केले आहे. बायडेन पायाच्या दुखण्यातून तोपर्यंत पूर्ण बरे होतील असे सांगितले जात आहे.