कुत्री आणि मांजरेही करतात रक्तदान

रक्त हे जीवनदायी आहे आणि रक्तदान हे महान पुण्य आहे असे म्हटले जाते. ज्याला खरोखर रक्ताची गरज आहे अश्या रुग्णाचा प्राण रक्त दिल्याने वाचू शकतो त्यामुळे जगातील बहुतेक सर्व देशात रक्तदान केले जाते आणि जादा रक्त ऐनवेळी उपयोगात आणावे म्हणून रक्तपेढ्यातून ते साठवून ठेवले जाते. माणसे जसे रक्तदान करतात तसेच कुत्री आणि मांजरे सुद्धा रक्तदान करतात हे अनेकांना माहिती नसेल.

हे प्राणी जखमी झाले किंवा अन्य काही कारणांनी त्यांना रक्त द्यावे लागले तर माणसाप्रमाणेच त्यांना रक्त देता येते. त्यासाठी कुत्री आणि मांजरे रक्तदान करतात आणि असे जादा रक्त रक्तपेढ्यामध्ये साठवून ठेवण्याची सुविधा आहे. या रक्तपेढ्या पेट ब्लड बँक म्हणून ओळखल्या जातात.

माणसाचे जसे विविध रक्तगट आहेत तसेच कुत्र्यांचे १२ तर मांजरांचे तीन रक्तगट आहेत. अमेरिकेत डिक्सन गार्डन, ग्रोव, स्टोकब्रीज, व्हर्जिनिया, ब्रीस्टो तसेच उत्तर अमेरिकेतील अनेक शहरात अश्या पेट ब्लड बँक आहेत. ब्रिटन मध्येही अश्या ब्लड बँक आहेत. कुत्री किंवा मांजरे यांना रक्तदान करण्यासाठी ३० मिनिटे लागतात असेही समजते.