रेल्वे स्टेशनवर आता पर्यावरणपूरक ‘कुल्हड’मध्ये मिळणार चहा


जयपूर: देशातील सर्व रेल्वे स्टेशनवरील चहाचे प्लॅस्टिक कप आता हद्दपार होणार असून त्याजागी आता पर्यावरणपूरक कुल्हड वापरण्यात येणार आहेत. राजस्थानमधील अल्वार जिल्ह्यात उत्तर-पश्चिम रेल्वेच्या एका कार्यक्रमात रविवारी बोलताना रेल्वमंत्री पियूष गोयल यांनी ही माहिती दिली.

प्लॅस्टिक मुक्त भारताकडे आपण रेल्वेच्या या धोरणामुळे एक पाऊल टाकत असल्याचे ते म्हणाले. आजच्या घडीला सुमारे 400 रेल्वे स्टेशनवर चहा हा कुल्हडमधून देण्यात येत आहे. चहासाठी यापुढे केवळ कुल्हडचा वापर करण्याचे धोरण रेल्वेने आखल्याचेही पियूष गोयल यांनी सांगितले.

पर्यावरणाचे रेल्वेच्या या धोरणामुळे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर लाखो रोजगारही निर्माण होणार आहेत. प्लॅस्टिकमुक्त भारताचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. भारतीय रेल्वेने या आवाहनाला प्रतिसाद म्हणून स्टेशनवर चहासाठी प्लॅस्टिकचा वापर न करता कुल्हडचा वापर करण्याचे ठरवले आहे.