हैदराबादचे नामकरण करणाऱ्या योगींवर ओवेसींचा पलटवार


हैदराबाद: हैदराबादमधील राजकीय वातावरण महापालिका निवडणुकीमुळे कमालीचे तापले आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. हैदराबादचे ज्यांना नामकरण करायचे, त्यांच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील. पण तरीही हैदराबादचे नामकरण होणार नसल्याचे म्हणत ओवेसींनी योगींवर पलटवार केला आहे. शहराचे ज्यांना नामकरण करायचे आहे, त्यांना आता जनतेनेच प्रत्युत्तर द्यायचे असल्याचे ओवेसींनी हैदराबादमधील मतदारांना साद घातली.

उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भाजपने महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पाचारण केले आहे. त्यावर ओवेसींनी खोचक शब्दांत टीका केली. या निवडणुकीत भाजपने एवढ्या इतक्या लोकांना बोलावले आहे की आता केवळ डोनाल्ड ट्रम्प यायचे राहिले आहेत. ते जरी आले तरीही काही होणार नाही. कारण त्यांना मोदींनी हात देत अबकी बार ट्रम्प सरकार म्हटले होते. पण ट्रम्प खड्ड्यात पडले. लाख लाख वेळा त्यांना मला जिन्ना म्हणावे. पण आम्ही जिन्नाच्या हाकेला प्रतिसाद दिलाच नव्हता. जे रझाकार होते, पाकिस्तानात ते गेले आणि जे प्रामाणिक होते, ते हैदराबादमध्येच राहिल्याचे ओवेसी म्हणाले.

हैदराबादचे नामकरण करुन भाग्यनगर करू, असे आश्वासन देणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्यावर ओवेसींनी जोरदार टीका केली. भाजपचे हैदराबादचे नाव बदलणे हेच लक्ष्य आहे. पण तुमच्या अनेक पिढ्या बर्बाद होतील, पण हैदराबादचे नाव बदलणार नसल्याचे प्रत्युत्तर ओवेसींनी दिले. त्यांनी यावेळी भाजपच्या तिकीट वाटपावरही निशाणा साधला. आम्हाला जातीयवादी म्हणतात. पण आम्ही तर हिदूंनाही उमेदवारी दिली आहे. किती मुस्लिम उमेदवार भाजपने दिले आहेत, ते सांगावे. त्यांना केवळ शहराचे नाव बदलण्यात रस असल्यामुळे आता भाग्यनगर विरुद्ध हैदराबाद असा संघर्ष असल्याचे ओवेसींनी म्हटले.