नितेश राणेंचा खळबळजनक दावा; संजय राऊतांच्या नातेवाईकांनादेखील ईडीच्या नोटिसा


हिंगोली: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सुरू केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच सरनाईक यांच्यानंतर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या नातेवाईकांनादेखील ईडीच्या नोटिसा आल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा होऊ लागल्या आहेत.

शनिवारी हिंगोलीत नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यामध्ये राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू असताना याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात आल्याची माझी माहिती असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

नातेवाईकांना नोटिसा मिळाल्यामुळेच संजय राऊत जास्त फडफडत आहेत. तसेच, ईडीच्या कारवाईमुळेच संजय राऊत हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले नव्हते ना?, अशीही मला शंका असल्याचेही नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.