चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंच्या लसीच्या वक्तव्यावरून टोला


पुणे – पुण्यात संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन होत असून देशाचे पंतप्रधान ते पाहण्यासाठी येत आहेत. यापेक्षा राज्य सरकारचे दुसरे यश काय असणार? असे कौतुकाचे उद्गार काढणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्या स्वप्नात आहेत का? असा प्रश्न केला होता. त्यानंतर रविवारी त्यांनी रविवारी पुन्हा एकदा दावा हास्यास्पद असल्याचे म्हणत सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. चंद्रकांत पाटील पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत एका विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

त्यांचा दावा हास्यास्पद आहे. कधीकधी आपण कुठे राहतो याचाच प्रश्न पडतो. ही लस पुण्यात विकसित झाली ते कोण नाकारत आहे. परंतु कोण त्याला आर्थिक साहाय्य करत आहे, त्यावर कोण लक्ष ठेवत आहे, लसीचा आढावा घ्यायला कोण आले हे जर तपासून पाहायला हवे. बारामतीत जर असते तर श्रेय बारामतीला दिले असते, असं म्हणत पाटील यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला. पण आम्ही पुणेकर आहोत, आम्हालाही ते मान्य आहे. म्हणून भारताने लस विकसित केली, यात पंतप्रधानांनी जातीने लक्ष घातले. आता लस देण्याचे नियोजन किती मोठे आहे. आता हे सुप्रिया सुळे करणार आहेत का? की हे आता बारामतीमध्ये तेथील लॅबमध्ये चालणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला.