रणबीरच्याच बिल्डिंगमध्ये आलियाने घेतला 32 कोटींचा नवा फ्लॅट


अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या नात्याबद्दल आपल्याला काही नवीन सांगायला नको. त्यातच त्या दोघांनीही आपल्या नात्याची सोशल मीडियावर कबुली दिली आहे. त्यानंतर हे लव्हबर्ड एवढ्यांदा एकत्र दिसू लागले होते की त्यांनी या नात्याला कबुली दिली नसती तरी अनेक गोष्टी लोकांना दिसत होत्याच. त्यातच या दोघांसदर्भात आता आणखी एक बातमी समोर आली ज्यामुळे रणबीर आणि आलियाचे चाहते नक्कीच सुखावणार आहेत. कारण बांद्र्याच्या पाली हिल परिसरात आलिया भटने नवा फ्लॅट विकत घेतला आहे. तब्बल 32 कोटी रुपये या फ्लॅटची किंमत आहे.

पाली हिलच्या वास्तू या अपार्टमेंटमध्ये आलिया भटने घेतलेला हा नवा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तब्बल दोन हजार चारशे साठ चौरस फुटांचा आहे. हा फ्लॅट या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर असून याच अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावर रणबीर कपूरचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट आलियाने घेतल्यानंतर गौरी खानला त्याचे इटेरिअर करायला दिले आहे. योगायोग असा की गौरी खाननेच रणबीर कपूरच्या फ्लॅटचे इटेरिअरही केले आहे. सध्या आलिया भटची दोन घरे आहेत. तिने जुहूला एक बंगला घेतला आहे. तर तिचे लंडनमध्येही एक घर आहे. या फ्लॅटमुळे आता या संख्येत आणखी एकाने भर पडली आहे.

या अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावर रणबीर कपूर काही वर्षांपासून राहतो. कपूर कुटुंबियांच्या बंगल्यापासून अगदीच जवळ असे हे अपार्टमेंट आहे. गेल्या काही वर्षांपासून कपूर कुटुंबियांच्या जवळ आलिया भट सातत्याने असते. अमेरिकेत ऋषी कपूर उपचार घेत असतानाही आलियाने रणबीरसोबत ऋषी कपूर यांची भेट घेतली होती. ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतरही अत्यंत जवळच्या लोकांमध्ये आलियाही होती. आता येत्या वर्षात हे दोघे लग्नही करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. पण कपूर कुटुंबियांनी वा भट कुटुंबियांनी त्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.