पंतप्रधानांच्या अहंकाराने जवान व किसान एकमेकांसमोर ठाकले: राहुल गांधी


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकारामुळे देशाचे आधारस्तंभ असलेले जवान आणि किसान एकमेकांच्या विरोधात समोरासमोर उभे ठाकल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. दिल्लीकडे आगेकूच करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर प्रियांका गांधी यांनीही कठोर टीका केली आहे.

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीकडे कूच करणारे शेतकरी आणि सरकारच्या आदेशानुसार त्यांना रोखू पाहणारे जवान यांचे छायाचित्र राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. त्यावर, ‘हे अतिशय विदारक चित्र आहे. वास्तविक, ‘जय जवान; जय किसान’ हा आपला नारा आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकाराने जवान आणि किसान यांना एकमेकांच्या विरोधात उभे केले आहे,’ अशी टिपण्णी त्यांनी केली आहे.

प्रियांका गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी उभारण्यात आलेल्या अडथळ्यांचे फोटो ट्विट करून त्यावर त्या म्हणतात, ‘ही पहा भाजप सरकारची व्यवस्था! भाजपचे खरबोपती मित्र जेव्हा दिल्लीला येतात तेव्हा त्यांना लाल पायघड्या घातल्या जातात आणि शेतकरी जेव्हा येतात तेव्हा त्यांना अडविण्यासाठी खड्डे खोदले जातात. दिल्लीत शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे बनविले जातात ते योग्य आणि त्याचा जाब विचारायला शेतकरी दिल्लीत येतात ते अयोग्य का, असा सवालही त्यांनी केला आहे.