‘नॉट नॉट सेव्हन’साठी युवकाने मोजले ३४ लाख रुपये


अहमदाबाद: ‘नॉट नॉट सेव्हन’ ही ‘सुपर स्पाय’ जेम्स बॉण्ड याची अनिवार्य ओळख! रगेल आणि रंगेल बॉन्डला मिळालेल्या ‘लायसेन्स टू किल’चे प्रतीक म्हणजे हा क्रमांक. आपल्या गाडीला हा क्रमांक मिळवा यासाठी गुजरातमधील एका युवकाने तब्बल ३६ लाख रुपये मोजले आहेत. त्याच्या गाडीची किंमत आहे ४० लाख रुपये.

गुजरातमध्ये वाहतूक व्यवसायात असलेल्या एका युवकाची इच्छा होती की आपल्या गाडीच्या नंबरप्लेटवर असा ‘हट के’ नंबर असला पाहिजे की ट्राफिक पोलिसांचे डोळे दिपून जावेत. त्यासाठी त्याने ००७ हा क्रमांक निवडला. आपल्या अचाट कृत्यांबरोबरच आलिशान राहणीमानाने हॉलिवूडच्या माध्यमातून जगभरच्या चाहत्यांवर पिढ्यानपिढ्या गारुड निर्माण करणाऱ्या जेम्स बंदचे आकर्षण अजूनही कायम असल्याचे दाखवून देणारी ही घटना आहे.

वास्तविक जेम्स बॉण्ड हा गुप्तहेर असल्याने त्याला प्रत्येक ठिकाणी आपले अस्तित्व दाखवून देणे योग्य नाही. त्यामुळे त्याने त्याच्या कारला कधीही ००७ हा क्रमांक वापरेलेला आढळून येत नाही. त्याचा पाठलाग बुचकळ्यात पाडण्यासाठी ‘रिव्हॉलविंग नंबरप्लेट’ ही त्याच्या गाड्यांची खरी खासियत आहे. अर्थातच प्रत्यक्षात अशी सुविधा कोणालाही मिळणे ही बाब अशक्यच आहे.

भारतात आरटीओकडून विशिष्ट ‘प्रीमिअम’ क्रमांकासाठी अधिक शुल्क आकारले जाते. भारतात ००१ या क्रमांकाला अधिक मागणी असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. विदेशातही विशिष्ट क्रमांकासाठी विशेष आकारणीची पद्धत आहे. तसेच एकदा वापरलेला नोंदणी क्रांमांक इतरांना विकण्याचीही मुभा आहे.

सन २०१८ मध्ये इंग्लंडमधील प्रीमिअर नंबरप्लेटची पुनर्विक्री करणाऱ्याने देशाच्या तिजोरीत -£ 2 अब्ज डॉलर्सची भर घातली. सन २००८ मध्ये ४ लाख ४० हजार डॉलरला विकल्या गेलेल्या ‘एफ 1′ या क्रमांकाला सध्या तब्बल १ कोटी डॉलर्सची किंमत आहे.