जीन्सच्या झिपवरील YKK अक्षरांमागचा हा आहे अर्थ

फोटो साभार अमर उजाला

कपड्यांचे नवनवीन प्रकार रोज बाजारात येत असले तरी गेली अनेक वर्षे जीन्स त्यांची लोकप्रियता कायम राखून आहेत. सर्व वयोगटातील आणि जगभरच्या सर्व देशातील नागरिक जीन्स मोठ्या हौसेने खरेदी करतात आणि वापरतातही. या जीन्सना जी झिप असते त्यावर ‘YKK’ अशी अक्षरे लिहिलेली अनेकांनी पाहिली असतील पण त्यामागचा अर्थ मात्र त्यांना माहिती असेलच असे नाही. जीन्स खरेदी करताना प्रत्येक जण झिप तपासून घेतो तेव्हा ही अक्षरे नजरेस पडतात.

YKK  हा एक शॉर्टफॉर्म आहे. त्याचा लॉंगफॉर्म आहे Yoshida kogyo kabushikigaisha. हे ऐकूनही अनेकांना काही बोध झाला नसेल. तर YKK  ही जगातील पहिली झिप उत्पादक कंपनी आहे. जगात वापरल्या जाणाऱ्या निम्म्याहून अधिक झिप याच कंपनीच्या आहेत. ७१ देशात या कंपनीचा व्यवसाय पसरला आहे त्यात भारताचाही समावेश आहे. कंपनीचा उत्पादन प्रकल्प अमेरिकेच्या जॉर्जिया येथे असून या प्रकल्पात रोज ७० लाख झीप्स तयार केल्या जातात. त्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे.

झिप या अद्भूत वस्तूचा शोध लावला जपानच्या टोक्यो शहरातील व्यापारी टाडो योशिडा याने. तोही १९३४ साली. त्याने मोठे काही संशोधन करण्यापेक्षा ही किरकोळ वस्तू बनविण्यावर सारे लक्ष केंद्रित केले आणि आज अब्जावधी लोकांची ती गरज बनली आहे. बॅग, कपडे यासाठी अन्य उत्पादनेसुद्धा ही कंपनी बनविते.