राऊत यांची सीबीआय, इडीवर टीका: केली कुत्र्यांशी तुलना

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय (इडी) यांच्यावर टीकेची झोड उठविणे सुरूच ठेवले आहे. त्यांनी एका व्यंगचित्राद्वारे या दोन्ही तपास यंत्रणांची तुलना कुत्र्यांशी केली आहे.

केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून विरोधकांवर दबाव आणण्यासाठी सीबीआय आणि इडीसारख्या शासकीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. याबद्दल राऊत यांनी अनेकदा भाजप आणि या यंत्रणांनाही टीकेचे लक्ष्य केले आहे. काही दिवसापूर्वी, इडीने राजकीय पक्षाची शाखा असल्यासारखे वागू नये, अशा शब्दात इडीला सुनावले होते.

आज राऊत यांनी दोन कुत्र्यांचे व्यंगचित्र ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. त्यापैकी एक कुत्रा सीबीआय तर दुसरा इडी असे या चित्रात दाखविण्यात आले आहे. सीबीआय इडीला सांगतो, जरा थांब कुणाच्या घरी जायचंय ते अजून ठरलेले नाही.