‘ठाकरे सरकार नाकर्ते’: वर्षपूर्तीनिमित्त फडणवीसांकडून ‘गिफ्ट’

मुंबई: ‘स्थगिती देण्यापलीकडे ठाकरे सरकारने वर्षभरात काहीही काम केलेले नाही. हे सरकार नाकर्ते आहे. आमच्याबद्दल पंतप्रधानांकडे कितीही तक्रारी केल्या तरी सरकारला वठणीवर आणण्याचे आमचे काम सुरूच राहील, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारला ‘गिफ्ट’ दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे प्रदेश भाजपच्या आंदोलनांबाबत तक्रार केली. या तक्रारीचा संदर्भ देत फडणवीस यांनी ठाकरे यांना उपरोधिक टोला लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सरकारच्या कामाचा समाचार घेतला.

‘तुमचे कुटुंब; तुमची जबाबदारी; हे या सरकारचे खरे ब्रीदवाक्य आहे. जनतेच्या कोणत्याही घटकाला समाधान देणे या सरकारला जमलेले नाही. सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा एकमेकात ताळमेळ नाही, अशी टीकाही त्यांनी केली. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक संसंर्ग महाराष्ट्रात, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, रस्त्यावर मृत्यू होताना बघायला मिळाले. असे असतानाही मुख्यमंत्री कोरोनाची परिस्थिती उत्तमपणे हाताळल्याचे प्रमाणपत्र स्वतःलाच कसे देऊ शकतात, असा सवालही फडणवीस यांनी केला. मराठा आरक्षणाबाबत या सरकारने मोठा घोळ घातला आहे. यांचे वकील सुनावणीला हजार राहत नाहीत. विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे, असे त्यांनी सांगितले. अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत प्रकरणातही ठाकरे सरकार तोंडावर आपटल्याची टीका त्यांनी केली.

‘ती’ मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाही

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपाला ‘सरळ’ करण्याची भाषा वापरली होती. त्यावर प्रतिक्रिया काय, अशी विचारणा केली असता, ही मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नसल्याचे फडणवीस म्हणाले. नाक्यावरच्या भांडणात वापरण्याची भाषा या मुलाखतीत ठाकरे यांनी वापरली आहे. ही मुलाखत मुख्यमंत्र्यांची असल्याचे वाटतच नाही. वास्तविक त्यांनी या वर्षातील कामांचा आढावा घेऊन पुढे काय करणार त्याचे नियोजन सांगणे अपेक्षित होते, असेही ते म्हणाले.