अंतराळात अगदी नजीक आले रशिया आणि भारताचे उपग्रह

फोटो साभार युट्यूब

अंतराळ कक्षेत भारताचा रिमोट सेन्सिंग उपग्रह कार्टोसॅट २ एफ आणि रशियन उपग्रह कानोपस व्ही अगदी जवळजवळ आल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या दोन्ही उपग्रहांची टक्कर होऊ शकेल अशी परिस्थिती असून दोन्ही देश उपग्रहांच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. हे दोन्ही उपग्रह २२४ मीटर अंतरावर असल्याचे रशियन अंतराळ संस्था रास्कोमोसचे म्हणणे आहे तर भारतीय अंतराळ संस्था इस्रोच्या मते उपग्रहांच्या मध्ये ४२० मीटर अंतर आहे.

शुक्रवारी म्हणजे २७ नोव्हेंबरच्या पहाटे ७०० किलो वजनाचा कार्टोसॅट २ एफ उपग्रह रशियन कानोपास व्ही च्या अगदी जवळ आला. हे दोन्ही उपग्रह पृथ्वीच्या रिमोट सेन्सिंग साठी डिझाईन केलेले आहेत. सर्व साधारण पणे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत शेकड्यांनी उपग्रह फिरत आहेत आणि त्यात १ किमीचे अंतर सुरक्षित मानले जाते. इस्रोचे प्रमुख डॉ. सिवन म्हणाले गेले चार दिवस आम्ही आपल्या उपग्रहावर नजर ठेऊन आहोत. या दोन्ही उपग्रहात ४२० मीटर अंतर आहे. दोन्हीतील अंतर १५० मीटरवर आले तरच पुढील कृती केली जाईल. पृथ्वीच्या एकच कक्षेत फिरणारे उपग्रह एकमेकाजवळ येणे ही सामान्य घटना आहे.

असा प्रकार झाला तर संबंधित दोन्ही देशाच्या अंतराळ संस्था एकमेकांशी चर्चा करून पुढील कारवाईचा निर्णय घेतात. अश्या घटना अनेकदा घडतात पण त्या सार्वजनिक केल्या जात नाहीत. नुकतीच स्पेन बरोबरही याच प्रकारच्या एका अन्य प्रकरणात चर्चा करून त्यावर तोडगा काढला गेला होता. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत १० सेंटीमीटर पासून एखाद्या कारच्या आकाराएवढे दोन हजाराहून अधिक उपग्रह आहेत असेही समजते.