दहशतवाद्यांवर काय कारवाई केली?


युरोपियन संसद सदस्यांचा पाकिस्तानला सवाल
लंडन: केवळ आर्थिक राजधानीलाच नव्हे तर संपूर्ण देशाला वेठीस धरणाऱ्या २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे नियोजन आणि संचालन करणाऱ्या लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेवर काय कारवाई केली, असा सवाल युरोपियन संसदेच्या सदस्यांनी पाकिस्तानला केला आहे.

२६/ ११ च्या हल्ल्यात बाली पडलेल्यांना जगभरातून श्रद्धांजली वाहिली जात असतानाच युरोपियन संसद सदस्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सविस्तर पात्र पाठवून दहशतवादाविरोधात पाकिस्तानच्या भूमिका आणि कृतीबद्दल विचारणा केली आहे. दि. २६ नोव्हेंबर २००८ मध्ये भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर झालेल्या नृशंस हल्ल्यात १६६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. ३०० जण जखमी झाले तर ९ दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील लष्कर ए तोयबाने स्वीकारली आहे.

पाकिस्तान स्वतःदेखील दहशतवादाला तोंड देत आहे. महिला काही कालावधीत पाकिस्तानात अनेक दहशतवादी कारवायांमध्ये शेकडो जण बळी पडले आहेत. २६/११ ची जबाबदारी घेणारी लष्कर ए तोयबाबरोबरच देशांतर्गत कारवाया करीत असलेल्या दहशतवाद्यांना आळा घालण्यासाठी पाक सरकारने काय कारवाई केली हे स्पष्ट कारवाई, अशी मागणी या युरोपियन संसद सदस्यांच्या पात्रात करण्यात आली आहे.

युरोपही दहशतवादाने ग्रासलेला आहे. दहशतवादी कृत्यांमुळे केवळ जीवित व वित्त हानी होते एवढेच नव्हे तर हजारो जणांवर होणारे मानसिक आघात वर्षानुवर्ष भोगावे लागतात. जनप्रतिनिधी म्हणून दहशतवादाचा बिमोड करणे आणि दहशतवादी कृत्यांमध्ये बळी पडलेल्यांना न्याय देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, याची जाणीवही या पत्रात करून देण्यात आली आहे. .