असा असेल नरेंद्र मोदींचा पुणे दौरा


पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (२८ नोव्हेंबर) कोरोना प्रतिबंधक लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिटय़ूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देण्यासाठी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दुपारी कंपनीला भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेणार आहे. पण त्यापूर्वीच आज कंपनीच्या आसपासच्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या भागामध्ये स्थानिक प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिटय़ूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीत तयार करण्यात येत आहे. उद्या पंतप्रधान मोदी हे दुपारी एक ते दोन या वेळेत त्या लसीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी त्यावेळी मोदी संवाद साधणार आहेत.

मोदी भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने दुपारी साडेबाराच्या सुमारास लोहगाव येथील विमानतळावर दाखल होतील. तेथून हेलिकॉप्टरने ते सीरम इन्स्टिटय़ूट येथील हेलीपॅडवर एक वाजण्याच्या सुमारास दाखल होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील तीन विशेष गाड्या देखील सीरम इन्स्टिटय़ूटच्या परिसरात दाखल झाल्या आहेत.

याबाबतची अधिकृत माहिती गुरुवारी पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली.पण जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारपासूनच पंतप्रधानांच्या दौऱ्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हा प्रशासनाला राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिल्याची माहिती दिली होती. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर विविध देशांचे राजदूतही पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूटकडून एस्ट्राजेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन घेण्यात येत आहे. चाचण्यांचे विविध टप्पे प्रगतिपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी पुण्यात येत आहेत.