पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा ६६ धावांनी पराभव


सिडनी – कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनच्या तब्बल ८ ते ९ महिन्यांच्या कालावधीनंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाने सिडनी येथे खेळवल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर ६६ धावांनी मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. विजयासाठी ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडिया ३०८ धावांपर्यंतच मजल मारु शकली. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने ९० तर शिखर धवनने ७४ धावांची खेळी केली, परंतू त्यांचे प्रयत्न अपूरे पडले.

विजयासाठी ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३७५ धावांचा पाठलाग करताना आश्वासक अशी भारतीय संघाची सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांनी ५३ धावांची भागीदारी केली. अग्रवालला हेजलवूडने माघारी धाडत टीम इंडियाला पहिला धक्का दिला, त्याने २२ धावा केल्या. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरही ठराविक अंतराने माघारी परतले. एका क्षणाला टीम इंडियाची अवस्था ३ बाद ८० अशी होती. यानंतर भरवशाच्या लोकेश राहुलनेही निराशा करत माघारी परतणे पसंत केले.

४ बाद १०१ अशा संकटात सापडलेल्या टीम इंडियाला अखेरीस शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी सावरले. दोन्ही फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली. शिखर आणि हार्दिरक पांड्या भागीदारी करत असताना टीम इंडियाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतू फिरकीपटू झॅम्पाने टीम इंडियाची जमलेली जोडी फोडत ऑस्ट्रेलियाला पुन्हा पुनरागमन करुन दिले. ७४ धावांची खेळी करत धवन बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतू झॅम्पाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना तो देखील सीमारेषेवर स्टार्ककडे झेल देऊन माघारी परतला. पांड्याने ९० धावांची खेळी केली. यानंतर भारताच्या अखेरच्या फळीतील फलंदाजांनी निराशाच केली. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू झॅम्पाने ४ तर हेजलवूडने ३ तर मिचेल स्टार्कने १ बळी घेतला.