सर्वोच्च न्यायालयाकडून गोस्वामी यांना जामीन देण्यामागील कारणांचा उलगडा


नवी दिल्ली – रायगड पोलिसांनी रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना या अटकेनंतर दिवाळीआधी जामीन मंजूर केला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना जामीन देण्यामागील कारणांचा उलगडा केला. न्यायालयाने यावेळी उच्च न्यायालयाने चूक केल्याचे म्हटले असून, अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध आरोप सिद्ध होत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केली होती. उच्च न्यायालयात जामीनासाठी त्यांनी अर्ज केला होता. पण त्यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळून लावत सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले होते. अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली होती.

याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंठपीठाने ११ नोव्हेंबर रोजी अर्णब गोस्वामींची जामीनावर सुटका केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज गोस्वामी यांना जामीन देण्यामागील कारण स्पष्ट केले. अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये त्यांच्याविरोधातील आरोप सिद्ध होत नाहीत. याप्रकरणी योग्य ती पडताळणी उच्च न्यायालयाने केली असती तर त्यांना भादंवि आयपीसी कलम ३०६ व एफआयआर यांच्यामध्ये काही संबंध नसल्याचे दिसून आले असते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

पुराव्यांमध्ये जर आरोपी छेडछाड करू शकतो वा आरोपी पळून जाऊ शकतो किंवा गुन्हा करण्याची शक्यता असेल, यावरून आरोपीला तुरुंगात ठेवायची गरज आहे की नाही. हे सगळेनंतर समोर आले आहे. हे प्रकरण सध्या एका नागरिकाच्या स्वातंत्र्याबद्दल असल्याचे न्यायालय म्हटले आहे.