शरद पवारांविरोधात बोलणाऱ्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही – उद्धव ठाकरे


मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. शरद पवारांविरोधात बोलणाऱ्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही. पवारांवर बोलण्याची त्यांची लायकी काय आहे?, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांचे नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

राजकारण, समाजकारण आणि प्रशासनाचा शरद पवारांना प्रदीर्घ काळाचा अनुभव आहे. सरकारला त्यांचे मार्गदर्शन सुद्धा आहे. तरीही पवार हे अत्यंत कमी उंचीचे नेते असल्याचे भाजप नेते सांगत आहेत, त्यावर तुम्हाला काय वाटते?, असा प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला असता त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर त्यांचे नाव न घेता टीका केली.

जाऊ द्या हो. मला असल्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांच्याबद्दल काही बोलायचीसुद्धा गरज वाटत नाही. त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही. ऐकू पण नये असली लोके आहेत ही. पण बोलणाऱ्यांची लायकी काय आहे? कोणीही काहीही बोलेल आणि काहीही ऐकायचे? कशाला वेळ घालवत आहात त्यात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीशी उत्तम समन्वय असून सरकार चालवताना कोणतीही कसरत करावी लागत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकार चालवताना कसरत करत असल्याचे मला तरी वाटत नाही. कारण काहीही असेल, पण तीनही पक्ष एकमेकांत असे मिसळून गेले आहेत. अगदी अजितदादा आहेत. बाळासाहेब थोरात आहेत, अशोकराव आहेत. कुणाकुणाची नावे घेऊ? नितीनराव आहेत, जितेंद्र आहेत, वडेट्टीवार आहेत, हसन मुश्रीफ आहेत, नवाबभाई आहेत. सगळ्यांचीच नावे घ्यावीशी वाटत आहेत, पण किती जणांची नावे घेऊ. माझ्याशी सगळे प्रेमाने, आपुलकीने आणि आदराने वागताहेत आणि मुख्यमंत्री महोदय म्हणतील तीच दिशा, अशीच त्यांची भूमिका असते.

मला आश्चर्य वाटते की, मी काही वेळेला कॅबिनेटमध्ये बघत असतो की, मला अनुभव नाही तरी मी बसलो आहे आणि ही सगळी लोक. कालपर्यंत आम्ही सगळे एकमेकांच्या विरोधात होतो. पण ज्या आपुलकीने आज ते वागत आहेत, ज्या आदराने वागत आहेत. त्यांचे वर्णन करता येत नाही. सगळे जण फार समजुतीने छान वागत आहेत आणि सगळे अतिशय चांगले चालले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.