आयआयटी व एनआयटीमध्ये मिळणार मातृभाषेतून शिक्षण


नवी दिल्ली: पुढील शैक्षणिक वर्षांपासून आयआयटी आणि एनआयटी या नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये मातृभाषेतून अभियांत्रिकीचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निःशंक यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

तांत्रिक शिक्षण, विशेषतः अभियांत्रिकी विभागाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मातृभाषेतून घेता यावे यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी देशातील काही विशिष्ट आयआयटी आणि एनआयटी संस्थांची निवड करण्यात आली आहे, असे शिक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने शालेय परीक्षा मंडळांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रवेश परीक्षांसाठी अभ्यासक्रम निश्चित करावा, अशी सूचना या बैठकीत देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त, फेलोशिप वेळेवर मिळावी यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने सतर्क राहावे आणि हेल्पलाईन सुरू करून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भातील समस्यांचे निवारण करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.