हिंदी महासागरात चिनी जहाजांचा अवैध वावर


नवी दिल्ली: हिंदी महासागरामध्य चीनच्या संशोधक आणि मासेमारी जहाजांचा अवैध वावर मोठ्या प्रमाणावर असल्याचे आढळून आले आहे. आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत अनिर्बंध मासेमारी आणि संशोधनाच्या नावाखाली संवेदनशील माहिती जमा करण्याच्या प्रकारामुळे भारत सतर्क झाला असून चिनी नौकांच्या हालचालींवर भारतीय नौदल बारीक नजर ठेऊन आहे.

या वर्षाच्या सुरूवातीला कराचीकडे जाणाऱ्या चिनी जहाजाने भारतीय सागरी हद्दीचा भंग केल्याबद्दल ताब्यात घेऊन कांडला बंदरात आणण्यात आले. या जहाजाची तपासणी केली असता त्यामध्ये क्षेपणास्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑटोक्लेव्हचा साठा असल्याचे आढळून आले. या घटनेमुळे भारतीय संरक्षण दलांच्या भुवया उंचावल्या आणि चिनी जहाजांच्या वावराचे गांभीर्य दिसून आले.

चिनी मासेमारी जहाजांचा विचार करता मागील ४ वर्षात हिंदी महासागरात तब्बल ४५० जहाजांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. ही जहाजे कोणत्याही देशाच्या सागरी हद्दीच्या बाहेर आंतरराष्ट्रीय हद्दीत मासेमारी करतात. त्यामुळे या मासेमारीला कोणतेही निर्बंध राहत नाहीत. त्याचा परिणाम सागरी जैव परिसंस्थेवर होतो. त्याचा परिणाम म्हणून दक्षिण आणि उत्तर कोरिया, जपान यांच्यापासून ते पश्चिम आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील माशांचे प्रमाण घटते. खोल समुद्रात केल्या जाणाऱ्या मासेमारीला चिनी सरकारकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे चिनी मासेमारांचा फायदा होत असला तरी इतर देशांचे आणि प्रामुख्याने सागरी पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.