‘ऑक्सफर्ड’ व ‘स्पुटनिक’चा एकत्रित वापर वाढवेल परिणामकारकता: रशियाला विश्वास


‘ऍस्ट्राजेनेका- ऑक्सफर्ड’ आणि रशियाने विकसित केलेली ‘स्पुटनिक या दोन्ही कोरोनाप्रतिबंधक लसींचा एकत्रित वापर अधिक परिणामकारक ठरू शकेल, असा विश्वास व्यक्त करीत त्या दृष्टीने प्रयोग करण्याची सूचना रशियाने ‘ऍस्ट्राजेनेका’ला केली आहे.

इंग्लंडमधील नियामकाने ‘ऍस्ट्राजेनेका- ऑक्सफर्ड’ लसीच्या निर्मिती प्रक्रियेतील त्रुटी निदर्शनास आणून देऊन त्याच्या परिणामकारकतेबद्दल शंका व्यक्त केली आहे. ‘ऍस्ट्राजेनेका’नेही या त्रुटींबाबत कबुली दिली आहे. त्यामुळे या लसीला नियमकांकडून मान्यता मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर रशियाने ‘ऍस्ट्राजेनेका’ला दोन्ही लसींचा एकत्रित वापर करण्याचे प्रयोग करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

स्पुटनिक-५ ही लस ९२ टक्के परिणामकारक असल्याचा दावा रशियाने केला आहे तर उत्पादन प्रक्रियेतील त्रुटी मान्य करूनही ‘ऍस्ट्राजेनेका- ऑक्सफर्ड’ लस किमान ६५ ते ७० टक्के परिणामकारक असल्याचा दोन्ही संस्थांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही लसींचा संयुक्त वापर अधिक परिणामकारक ठरू शकतो, अशी शक्यता रशियाने वर्तविली आहे. ‘ऍस्ट्राजेनेका’ जर नव्याने चाचण्या करणार असेल तर त्यांनी ‘स्पुटनिक’ आणि त्यांची लस याचा एकत्रित वापर करण्याचा प्रयोग करून बघावा. त्यामुळे अधिक चांगले परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे, असे ‘स्पुटनिक’ विकसित करणाऱ्या संशोधकांनी ट्विटरवर नमूद केले आहे.