शिवेंद्रराजे भोसलेंसह 16 कार्यकर्त्यांना आनेवाडी टोलनाका आंदोलन प्रकरणी जामीन मंजूर


सातारा : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मागील वर्षी 18 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याची दुरावस्था, सुविधांचा अभाव या प्रकरणी आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन केले होते. आज या प्रकरणी शिवेंद्रराजे भोसलेंसह 16 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सातारा येथील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आनेवाडी टोल नाक्यावर शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली 18 डिसेंबर 2019 रोजी आंदोलन करण्यात आले होते. सातारा-पुणे महामार्गाची मागील वर्ष भरापासून दुरावस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रस्ते दुरुस्तीसाठी याबाबत 15 दिवसांचा अल्टीमेटमही देण्यात आला होता. पण रस्ते दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट आनेवाडी टोलनाक्यावर मोर्चा नेला होता. भोसले समर्थकांनी यावेळी टोल वसुली बंद करत नाक्यावरील वाहने पैसे न घेता सोडली. यावेळी शिवेंद्रराजेंनी वाहन चालकांना टोलनाक्यावर गुलाबाचे फुलही दिले होते.

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारा-पुणे महामार्ग सोडला तर इतर रस्ते सुस्थितीत आहेत. पण आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्याच्या दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब असल्याची तक्रार सामान्य प्रवासी करत असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले होते.