कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना दि. ३ डिसेंबर रोजी चर्चेचे निमंत्रण


नवी दिल्ली: दिल्लीला धडक देण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना थोपविण्यासाठी एकीकडे प्रशासनाकडून जंग जंग पछाडले जात असतानाच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना दि. ३ डिसेंबर रोजी चर्चेसाठी पाचारण केले आहे. सरकार शेतकऱ्यांशी खुल्या दिलाने चर्चा करण्यास तयार आहे. त्यांनी संयम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार बांधील आहे. यापूर्वीही सरकारने शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आणि यापुढेही चर्चा करण्याची आपली तयारी आहे. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. सरकारवर विश्वास ठेवावा आणि चर्चेसाठी पुढे यावे, असे तोमर यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. सरकार सातत्याने त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वृद्धिंगत करण्याचा शब्द सरकारकडून पळाला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नका, असे आवाहनही तोमर यांनी विरोधी पक्षांना केले.