अमेरिकन आकाशात ट्रॅफिक जाम

फोटो साभार दैनिक भास्कर

जगात सर्वाधिक करोना संक्रमण असलेल्या अमेरिकेतील नागरिकांनी करोनाला न जुमानता ‘ थँक्स गिव्हिंग’ निमित्त मिळत असलेल्या सुटीचा पुरेपूर वापर केल्याचे दिसून येत आहे. आठवडाभराच्या या सुटीसाठी इतके नागरिक प्रवास करत आहेत की त्यामुळे तासाला सात हजार विमाने उड्डाण करत असल्याचे समजते. त्यामुळे आकाशात सुद्धा ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बुधवारी अमेरिकेत १५ लाख विमान प्रवासी होते तर रविवार पर्यंत ६३ लाख नागरिक विमान प्रवास करणार आहेत. त्यामुळे दर तासाला सात हजार उड्डाणे होत आहेत. ६५ टक्के प्रवासी अमेरिकेतच प्रवास करत आहेत. ४३ लाख नागरिकांनी खासगी वाहनांनी प्रवास केला आहे तर ३.५० लाख नागरिकांनी ट्रेनचा पर्याय स्वीकारला आहे.

‘ थँक्स गिव्हिंग’ निमित्त अमेरिकेत राष्ट्रीय सुट्टी दिली जाते. आपल्याला आयुष्यात जे दिले त्याबद्दल देवाचे आभार मानून त्याला धन्यवाद देण्याची ही प्रथा आहे. या निमित्त कुटुंबातील सर्व जण एकत्र येऊन आनंदात वेळ घालवितात. मेजवान्या आयोजित केल्या जातात. हा दिवस सर्वप्रथम १६२१ साली साजरा केला गेला तेव्हा ५० तीर्थयात्री आणि ९० भारतीय त्यात सामील होते असे समजते.