मेड इन इंडिया ‘टूटर’ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढली

भारत सरकारने अलीकडच्या काळात अनेक चीनी अॅप्सवर बंदी घालाल्यामुळे मेड इन इंडिया अॅप्सला चांगला फायदा होताना दिसत आहे आणि ही अॅप्स अधिकाधिक चर्चेत येऊ लागली आहेत. जगभरात लोकप्रिय ट्विटरला टक्कर देण्यासाठी सुरु झालेला स्वदेशी सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म टूटर हे याचे उदाहरण म्हणता येईल. मेड इन इंडिया उपक्रमात सुरु केल्या गेलेल्या या नेटवर्किंगचा वापर देशातील अनेक मान्यवर करत असल्याचे सांगितले जात आहे.

टूटरवर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे खाते सुरु केल्याचा स्क्रीन शॉट या संदर्भात वेगाने व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर गृह्मंत्री अमित शहा, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांचीही अकौंट या साईटवर असल्याचे व ही सर्व अकौंट व्हेरीफाईड केली गेल्याचे समजते.

अर्थात या साईटवर सुरु झालेली ही अकौंट प्रत्यक्ष त्या व्यक्तींनी सुरु केली का अन्य कुणी खोडकरपणा केला याचा खुलासा होऊ शकलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार जून जुलै मध्ये टूटर लाँच झाले आणि ऑगस्ट मध्ये मोदींचे अकौंट त्यावर आले. हे अॅप गुगल प्ले स्टोर मध्ये उपलब्ध आहे. सध्या त्याचे अँड्राईड व्हर्जन मिळते आहे. दिसायला ते ट्विटर सारखेच दिसते आहे फक्त लोगो मध्ये पक्ष्याऐवजी शंख दिसतो आहे.

टूटर ने त्यांच्या वेबसाईट वर ‘ आमच्या स्वदेशी आंदोलन २.०’ मोहिमेत सामील व्हा असे आवाहन केले आहे.