झटका; प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय अमित चांदोळेंना तीन दिवसाची कोठडी


मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांना 29 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आल्यामुळे तीन दिवस चांदोळे ईडीच्या ताब्यात राहणार आहेत. ईडीकडून त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. अनेक धक्कादायक खुलासे या चौकशीतून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच चांदोळे यांना न्यायालयाने कोठडी सुनावल्याने हा सरनाईक यांच्यासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

ईडीने काल टॉप्स समूह आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अमित चांदोळे यांची कसून चौकशी केली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. ईडीने आज सकाळी चांदोळे यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चांदोळे यांना तीन दिवसाची कोठडी सुनावल्यामुळे 29 नोव्हेंबरपर्यंत चांदोळे ईडीच्या ताब्यात राहणार असून अनेक धक्कादायक माहिती या चौकशीतून पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील ही अत्यंत महत्त्वाची चौकशी मानली जात आहे. चांदोळे यांच्याकडून या तीन दिवसात मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडी पुढील सूत्रे हलवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.