येत्या शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूटला भेट देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी


पुणे – येत्या शनिवारी २८ नोव्हेंबरला पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया संस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. पुणे दौऱ्यात ‘कोविशिल्ड’ लस निर्मितीच्या प्रगतीचा पंतप्रधान मोदी आढावा घेणार आहेत. ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाने मिळून विकसित केलेल्या या लसीची निर्मिती पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूट करत आहे.

सध्या देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात होत असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सिरम इन्स्टीट्यूटने उत्पादन आणि वितरणासाठी ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकासोबत करार केला आहे. ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लसीचे भारतात ‘कोविशिल्ड’ असे नाव आहे. येत्या २८ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देणार असल्याच्या वृत्ताला पुण्याचे विभागीय आयुक्त सौरव राव यांनी दुजोरा दिला आहे.

एस्ट्राझेनेका कंपनीने सोमवारी ब्रिटन आणि ब्राझीलमध्ये केलेल्या चाचण्यांचे तात्पुरते निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार या लसीचे दोन वेगवेगळ्या प्रकारे डोस देऊन तिच्या परिणामकारकतेच्या चाचण्या करण्यात आल्या. एका डोस पद्धतीत ९० टक्के परिणामकारकता, तर दुसऱ्या डोस पद्धतीत ६२ टक्के परिणामकारकता आढळल्यामुळे दोन्ही चाचण्यांचा विचार करून ही लस ७०.४ टक्के परिणामकारक किंवा प्रभावी असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर अदर पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना प्रतिबंधक लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारसोबत करार केला असून आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे.

अजून दोन ते तीन महिने भारतात लस उपलब्ध होण्यासाठी लागतील. आपल्याकडे जानेवारीपर्यंत किमान १० कोटी डोस तयार असतील. जुलैपर्यंत ३० कोटी डोसचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. आम्ही किंमत ठरवत असून १००० रुपयांपर्यंत उपलब्ध असेल. खासगी मार्केटसाठी ५०० ते ६०० रुपये असणार आहे. तर सरकारसाठी २५० किंवा त्यापेक्षा कमी असेल, अशी माहिती काही दिवसांपूर्वी अदर पूनावाला यांनी दिली होती.