प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर संविधान आणि लोकशाहीचा अपमान केल्याचा आरोप


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी मंगळवारी दाखल झाले. ईडीच्या पथकाने प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयांमध्ये शोधमोहिम हाती घेतली. ईडीच्या कार्यालयात नेऊन प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची दीर्घ काळ चौकशी करण्यात आली. या साऱ्या घटनाक्रमानंतर, भाजप नेतेमंडळी सरकार पाडण्यासाठी ईडीला हाताशी घेऊन अशाप्रकारे दबाव आणत असल्याची भूमिका महाविकास आघाडीच्या बहुतांश मंत्र्यांनी मांडली. संजय राऊत यांनी तर महाराष्ट्रात आमचे सरकार आहे हे लक्षात ठेवा, असा इशाराही दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमच्यावर सूड उगवलात तर आम्ही १० सूड काढू असे म्हणाल्याचे त्यावर आपले मत काय असा प्रश्न प्रविण दरेकर यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना दरेकर म्हणाले, राजकारणात प्रत्येक जण हा लढणारा कार्यकर्ता असतो. प्रत्येक जण सुडाचा बदला सुडाने घेऊ शकतो. पण सुडाला सुडाने उत्तर देऊ असे म्हणण्यापेक्षा सुडाला वैचारिक उत्तर देण्याची आवश्यकता आहे. एखादी कारवाई झाली असेल तर त्यावर चर्चा केली जाऊ शकते. पण अशाप्रकारे वक्तव्य संविधान दिवसाच्या वेळीच केल्याने मुख्यमंत्र्यांनी लोकशाही आणि संविधानाचा अपमान केल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये अंतर्गत विसंवाद आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पाडण्याच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट केली आहे. पण सत्ता जाण्याची भीती या सरकारलाच वाटते आहे. अंतर्गत विसंवादाने सरकार कोसळण्याची भीती त्यांना वाटते आहे. त्यांना राज्यातील जनतेच्या मनात असलेला आक्रोश जाणवल्यामुळे भीतीपोटी मविआचे नेते भाजपवर आरोप करत असल्याचेही दरेकर म्हणाले.