आंदोलनात ‘खळ्ळ खट्याक’ नको: राज ठाकरे यांचा आदेश


मुंबई: ‘खळ्ळ खट्याक’ ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आंदोलन करण्याची ‘मनसे’ स्टाईल असली तरीही आज वाढीव वीजबिलांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात ‘खळ्ळ खट्याक’ नको, असे आदेश पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

वाढीव वीज बिलांच्या विरोधात राज्यभरात मनसेकडून आंदोलन केले जात असून सरकारकडून पोलिसांमार्फत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केले जात आहेत. अनेक ठिकाणी आंदोलने सुरु होण्यापूर्वीच नेते, कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर पाळा असे सरकारचे आदेश आहेत. लोकांच्या जीवाची पोलिसांना काळजी घ्यावी लागत आहे. त्यांना त्यांचे काम करणे भाग आहे. त्यामुळे आंदोलक मनसैनिकांनी पोलिसांना सहकार्य करायचे आहे, असे आदेश ठाकरे यांनी दिले आहेत.

या आंदोलनात शांतता पाळा. तोडफोड करू नका. शारीरिक अंतर पाला, असे आदेश पक्षप्रमुखांनी दिल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. हा मोर्चा केवळ पक्षाचा नाही. वीजबिलाचा ‘शॉक’ बसलेले सामान्य नागरीक या मोर्चात सहभागी झाले असून हा मोर्चा सर्वसामान्यांच्या नेतृत्वाखाली निघाला आहे. त्यामुळे तो शांततेतच असेल, असेही ते म्हणाले.