वीज तोडायला याल तर गाठ मनसैनिकांशी: राज ठाकरे


मुंबई: विजेचे बिल भरूच नका, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. वीज जोडणी तोडायला कोणी आले तर त्यांची गाठ मनसैनिकांशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे, अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

लॉकडाऊनमध्ये विजेचा वापर जास्त झाल्याचे कारण देत महावितरणच्या वतीने राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल पाठवण्यात आली आहेत. अवाजवी वीज बिल आल्यामुळे राज्यातील जनतेमध्ये संताप आहे. सरकारने दिवाळीपूर्वी अवाजवी बिलांपासून मुक्तता देण्याची ‘चांगली बातमी’ दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन देऊन त्यानंतर घुमजाव केले. याच्या निषेधार्थ नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढले.

बहुतेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीही पक्षाच्या वतीने मोर्चे काढण्यात आल्याने अनेकदा पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलन सुरु होण्यापूर्वीच मनसे कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक नवी मुंबई या ठिकणी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटपटही झाली.