हैदराबाद महापालिका भाजपने केली प्रतिष्ठेची: शहा, नड्डा करणार प्रचार


हैदराबाद: हैदराबाद महापालिकेच्या निवडणुका या वेळी अत्यंत रंजक ठरणार आहेत. भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून यावेळी महापौरपदी आपलाच उमेदवार विराजमान करण्याचा पक्षाचा निर्धार आहे. त्यामुळे या शनिवार व रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा हैदराबाद येथे प्रचारासाठी येत आहेत. बुधवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. आठवड्याच्या सुरूवातीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही येथे हजेरी लावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील हैदराबादमध्ये प्रचारासाठी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उत्तर प्रदेशचे ‘फायरब्रॅन्ड’ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनासुद्धा स्टार प्रचारक म्हणून या निवडणुकीत आणण्यात येणार आहे. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) च्या १५० नागरी जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या वर्षाचा पालिकेचा अर्थसंकल्प ५ हजार ३८० कोटी रुपये असेल.

महापालिकेच्या मागील निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने बाजी मारली होती. समितीला ९९ जागा मिळाल्या. भाजपाने ४ जागा जिंकल्या आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘एआयएमआयएम’ने ४४ जागा पटकावला. कॉंग्रेसला २ तर टीडीपीला १ जागा मिळाली. यावेळी प्रचारात मोहम्मद अली जिनांपासून ‘सर्जिकल स्ट्राईक’ पर्यंत सर्वाचा उल्लेख झाला आहे. भाजपा खासदार तेजस्वी सूर्य यांनी ओवैसी यांना जिनांचा अवतार म्हटले, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार म्हणाले की, जर त्यांचा पक्ष सत्तेत आला तर सहकारातील घुसखोरांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करेल.