नरसिंह राव आणि ‘एनटीआर’ यांच्या समाध्या पाडा: अकबरुद्दीन ओवेसी


हैदराबाद: अतिक्रमणांच्या नावाखाली गरिबांची घरे पाडण्याऐवजी माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एन टी रामराव यांची समाधी उध्वस्थ करण्याचे धाडस दाखवा, असे आव्हान ‘एमआयएम’चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज्य सरकारला दिले आहे.

बृहन हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाच्या बैठकीत ओवेसी बोलत होते. हुसेनसागर तलावाच्या परिसरात अतिक्रमण केल्याच्या नावाखाली सरकार गरिबांच्या डोक्यावरचे छप्पर हिरावून घेण्याच्या विचारात आहे. मात्र, स्वतः सरकारने धरणाच्या जागेत अतिक्रमण करून समाध्या उभारल्या आहेत. त्या समाध्या पाडण्याचे धैर्य सरकारने दाखवावे, असे ओवेसी म्हणाले.

हुसेनसागर तलावाचे नियोजन करताना ४ हजार ७०० एकर जागा धरणासाठी अधिग्रहित करण्यात आली. सध्या धरण ४ हजार एकर जागेवर उभे आहे. मग उरलेल्या ७०० एकर जागेचे झाले काय, असा सवाल ओवेसी यांनी केला. मक्ता मदार साहेब वसाहत बेकायदेशीर असल्याचा आरोप करणाऱ्या सरकारनेच या जागेवर अतिक्रमण करून ‘नेकलेस’ रस्ता आणि पी व्ही नरसिंह राव आणि एन टी रामाराव यांच्या समाध्या उभारल्या आहेत. अतिक्रमणे काढायचीच असतील तर गरिबांच्या डोक्यावरचे छप्पर उखडण्यापूर्वी या समाध्या पाडण्याचे काम सरकारने करावे, असे आव्हान ओवेसी यांनी दिले.