सेलिब्रिटी शेफ गॉर्डन रॅम्से विकणार ७ हजार रुपयांचा बर्गर


लंडन: सेलिब्रिटी शेफ गॉर्डन रॅम्से यांचे नवीन रेस्तराँ लवकरच सुरु होत आहे. या रेस्तरॉमध्ये एका विशिष्ट प्रकारच्या बर्गरची किंमत आहे तब्बल ७ हजार रुपये! या ठिकाणी मिळणार असलेल्या अन्य पदार्थांच्या किंमतीही अशाच हजारात असणार आहेत.

लॉक डाऊन उठल्यानंतर ‘गॉर्डन रॅम्सेस बर्गर’ ४ डिसेंबरपासून सुरू करणार आहे. या बाबतची माहिती त्याने ट्विटरवर एका व्हिडिओद्वारे दिली आहे. या रेस्तराँमध्ये भाजलेला बीफचा तुकडा, ट्रफल पिकॉरिनो चीज, केप मेयॉनीज, ब्लॅक ट्रफल यांचा समावेश असलेला बर्गर ८० युरोला (७०३३ रुपये) विकला जाणार आहे. लॉब्स्टर आणि शिंपल्याच्या बर्गरची किंमत असणार आहे ३ हजार ६९२ रुपये, तर हॉटडॉग मिळेल १ हजार ८४६ रुपयांना!

इंग्लंडमध्ये उपलब्ध असणारे सर्वोत्कृष्ट मीट वापरून बनवलेले या रेस्तरॉंमधील बर्गर हा आपल्या आयुष्यातील संस्मरणीय अनुभव ठरेल, असा दावा गॉर्डन रॅम्से याने ट्विटरवर केला आहे.