…यामुळे ट्विटरने डिलीट केले भाजप नेते सुशीलकुमार मोदींचे ‘ते’ ट्विट


नवी दिल्ली – ट्विटरकडून बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते आणि सुशील कुमार मोदी यांनी केलेले ट्विट डिलीट करण्यात आले आहे. सध्या तुरूंगात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता पक्षाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्यावर गंभीर आरोप करणारे ट्विट सुशील कुमार मोदी यांनी केले होते. ट्विटरच्या आचारसंहितेचा भंग करणारे मोदी यांचे ट्विट असल्याने ट्विटरकडून ते डिलीट करण्यात आले आहे.

लालू प्रसाद यादव तुरूंगातून सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी आरोप केला होता. एनडीएच्या आमदारांना ते तुरूंगातून फोन करून मंत्रीपद देण्याचे आश्वासन देत असल्याचेही मोदी यांनी म्हटले होते. आपण एनडीएच्या आमदारांना कॉल आलेल्या नंबरवर कॉल केला, तेव्हा लालू प्रसाद यादव यांनीच फोन उचलला. असे करून नका, यात तुम्ही यशस्वी होणार नसल्याचे आपण त्यांना म्हटल्याचे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप करताना कॉलचा उल्लेख सुशील कुमार मोदी यांनी केला होता. तो मोबाईल नंबरही त्यातच त्यांनी ट्विटमध्ये केला होता. ट्विटमध्ये मोबाईल नंबर देणे ट्विटरच्या आचारसंहितेचा भंग असून, त्या कारणामुळे ट्विटरने हे ट्विट डिलीट केले आहे.