गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनला अजित पवारांचा विरोध!


पंढरपूर : देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोना सकंटाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच राज्याचे अनेक मंत्री पुन्हा एकदा लॉकडाऊनबाबत भाष्य करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. अजित पवार यांनी गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नको, असे म्हणत आपला विरोध दर्शवला आहे. हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची गेल्या नऊ महिन्यापासून अवस्था फारच बिकट झाली आहे.त्यांचे घर रोज काम केले तर चालते. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका अशाच लोकांना बसतो. तरीही ज्या ज्या वेळी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केले तेव्हा निमूटपणे हा सर्व समाज आदेश पाळत आल्याचे सांगत कोरोना वाढू नये याची काळजी घेऊया, असे अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीची पूजा होत असते, आषाढीची पूजा तुम्ही कधी करणार? असा प्रश्न विचारला असता पांडुरंगाने जे दिले आहे त्यात समाधान मानावे आणि पुढे चालावे, अशा शब्दात सध्या तरी उपमुख्यमंत्रीपदावरच समाधानी असल्याचे अजित पवारांनी सांगितले. वारकरी संप्रदाय समंजस असून काही मंडळींनी वेगळी भूमिका घेतली असली तरी त्यांच्या भूमिकेस राज्यातील वारकऱ्यांचा पाठिंबा नसल्याचे अजित पवारांनी सांगितले. केंद्र व राज्यात कोरोनामुळे कर जमा होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने दिलेल्या निधीचा योग्य वापर होत नसेल तर कारवाई करावी लागेल, असा इशाराही अजित पवारांनी यावेळी दिला.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विठुरायाला राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे, असे साकडे घातले. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्याची भरभराट होऊ दे, असेही अजित पवारांनी विठुरायाला साकडे घातले आहे. आज कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची उपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली.

राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे, कोरोनाची लस लवकर उपलब्ध होऊन जगाची यातून सुटका कर असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातले. अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज पहाटे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी कवडूजी भोईर व कुसुमाबाई भोईर हे मानाचे वारकरी दाम्पत्य महापूजेत सामील झाले होते.

राज्यातील शाळा सध्या बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे , शेतकरीही अडचणीत आला आहे, अशावेळी लवकरात लवकर कोरोनाची लस आल्यास जगाला व राज्याला दिलासा मिळेल, असे अजित पवारांनी महापूजेनंतर बोलताना सांगितले. यावेळी येताना यात्रा अनुदानाचा चेक घेऊन आल्याचे सांगताना, आषाढीच्यावेळी दिलेल्या चेकचे पैसे जमा झाले नव्हते, ही आमची चूक असल्याने ती आता दुरुस्त केल्याचे अजित पवारांनी सांगितले. वारकऱ्यांच्या नाराजीबाबत अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर हा प्रश्न सुटला व चांगला मार्ग निघाल्याचे सांगताना वारकरी नेहमी नियम व कायद्याचे पालन करणारे असल्याची पुष्टीही अजित पवारांनी जोडली .