मुंबईच्या 4 पोलिसांना राजस्थानमध्ये 2 लाखांची लाच घेताना अटक


जयपूर – राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जयपूरमध्ये मोठी कारवाई करत मुंबईच्या 4 पोलिसांना दोन लाखांची लाच घेताना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका अधिकाऱ्यासह तीन कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवलीतील पोलीस ठाण्यात अटक करण्यात आलेले चारही पोलीस हे कार्यरत आहेत. हे चारही जण जयपूरला एका प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी आले होते. त्यांना त्याचवेळी लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

लाच मागितल्याप्रकरणी बुधवारी बोरिवली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलिसांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई राजस्थान लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केली असून दोन लाखांची मागणी त्यांनी केल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, कॉन्स्टेबल लक्ष्मण, सुभाष पांडुरंग आणि सचिन गुडके अशी आहेत.

बोरिवलीत राहणारा कापड व्यापारी विनोद हा भाडे तत्वावर दुकान चालवतो. फसवणुकीचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. जयपूरला विनोदला अटक शिंदे आणि त्याचे पथक करण्यासाठी गेले. तेव्हा त्याच्या वडिलांनाही अटक करण्याचे त्यांनी धमकावले. तसेच त्यांच्याकडून दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानुसार त्यांच्या घर मालकाने जयपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यानंतर लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.