‘जल्लीकट्टू’ जाणार ऑस्करसाठी

यंदा ऑस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी भारतातून मल्याळी भाषेतील ‘जल्लीकट्टू’ या चित्रपटाची निवड केली गेली आहे. या चित्रपटाने ऑस्कर निवडीपूर्वी भारतीय आणि विदेशी चित्रपट महोत्सवात अनेक पारितोषिके मिळविली आहेत. या चित्रपटाचा प्रीमियर ६ सप्टेंबर २०१९ रोजी टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये झाला होता आणि या चित्रपटाला प्रचंड पसंती मिळाली होती. त्यानंतर ४ ऑक्टोबर २०१९ मध्ये केरळ राज्यात तो रिलीज झाला. बुसान इंटरनॅशनल फेस्टिव्हल मध्ये तसेच ५० व्या फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया मध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक लीझो जोस पेल्लीसारी याना बेस्ट दिग्दर्शक म्हणून गौरविले गेले होते. त्यावेळी या चित्रपटाने अनेक अन्य पारितोषिके मिळविली होती.

चित्रपटात एका खाटीकाची कथा सांगितली गेली आहे. या खाटीकाकडून सर्व गावाची मांसाची गरज पूर्ण होत असते. एकदा एक रेडा कापण्याच्या प्रयत्नात रेडा कसायाच्या हातून सुटतो आणि गावात पळून जातो. त्याला पकडण्यासाठी केलेले प्रयत्न यात दाखविले गेले आहेत. त्याचबरोबर अनेक अन्य कथा त्याच्याशी जोडल्या गेल्या असून त्यात बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, गरिबी अश्या समस्यांवर भाष्य केले गेले आहे.

चित्रपट निवड समितीने ऑस्कर साठी अन्य भाषातील २७ चित्रपटाचा विचार केला आहे. त्यात बॉलीवूड मधील गुलाबो सिताबो, स्काय इज पिंक, छपाक, सिरीयस मॅन, शकुंतला देवी, शिकारा, छलांग या चित्रपटाचा समावेश असल्याचे समजते.