उटा वाळवंटात दिसला रहस्यमयी चकाकता खांब

अमेरिकेच्या दक्षिण उटा वाळवंटात लाल खडक परिसरात एक चमकदार धातूचा उंच खांब आढळला आहे. सोशल मीडियावर या खांबाचे फोटो खुपच व्हायरल झाले असून हा खांब येथे कुणी ठेवला असावा यावर चर्वितचर्वण आणि अनेक अफवा पसरू लागल्या आहेत. हा खांब परग्रहवासीयांनी ठेवला असावा अशीही चर्चा सुरु झाली आहे.

गेल्या बुधवारी गस्ती विमानातून मेंढ्या मोजणीचे काम केले जात असताना अचानक हा चमकदार खांब वैमानिकाच्या नजरेस पडला होता असे समजते. याची माहिती उटा डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीला मिळाल्यावर त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यानंतर जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये सार्वजनिक जागेवरील प्रतिबंधित जागेवर परवानगीशिवाय काहीही स्थापन करता येत नसल्याचे म्हटले गेले असून कोणत्याही ग्रहावरून तुम्ही आला असलात तरी परवानगी घ्यावीच लागते असा खुलासा केला गेला आहे.

हा खांब साधारण १२ फुट उंचीचा आहे. या खांबाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्यावर प्रतिक्रियांचा पाउस पाडला आहे. कुणाच्या मते हे २०२० चे रिसेट बटण असावे तर कुणाला ते करोना लस साठवण केंद्र वाटले आहे. कुणी परग्रहवासीयांनी हा खांब येथे उभा केला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे. तर कुणाच्या मते ही एखाद्या कलाकाराची कृती असावी.