प्रसिध्द फुटबॉलपटू मॅराडोनाचे निधन

फोटो साभार फुटबॉल न्यूज

अर्जेंटिनाचा महान स्टार फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचे वयाच्या ६० व्या वर्षी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाल्याचे वृत्त आहे. अर्जेंटिना स्थानिक मिडीयाने मॅराडोना याचे घरातच निधन झाल्याचे म्हटले असून दोन आठवड्यापूर्वी त्याच्या मेंदूत झालेली रक्ताची गुठली काढण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली गेली होती.

आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये वयाच्या १६ वर्षी करियरची सुरवात करणाऱ्या मॅराडोनाने जगात महान फुटबॉलपटू म्हणून कीर्ती मिळविली होती. १९८६ च्या वर्ल्ड कप मध्ये त्याचे मोठे योगदान होते आणि तेव्हापासूनचा त्याच्या झळाळत्या करियरची सुरवात झाली होती. या स्पर्धेत इंग्लंड विरुध्द खेळताना मॅराडोनाची ओळख ‘हँड ऑफ गॉड’ या उपाधीने झाली आणि तीच ओळख अखेरपर्यंत कायम राहिली.

महान फुटबॉलपटू पेले प्रमाणे १० नंबरची जर्सी मॅराडोना वापरत होता. त्याच्या आयुष्यात अनेक वादविवाद आणि चढउतार होते. ३० ऑक्टोबर १९६० मध्ये जन्मलेल्या मॅराडोनाने लहान वयात फुटबॉल खेळायला सुरवात केली आणि वयाच्या ११ वर्षी तो अर्जेंटिना ज्युनियर टीम मध्ये निवडला गेला. १९७६ पासून त्याने व्यावसायिक खेळाडू म्हणून करियर सुरु केले आणि राष्ट्रीय टीम मधला तो सर्वात युवा खेळाडू ठरला.

मॅराडोनाने पाहिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा गोल १९७९ मध्ये नोंदविला त्यावेळी तो ज्युनिअर विश्वकप खेळला होता. १९८२ मध्ये त्याने अर्जेंटिनाला विश्वकप मिळवून देण्यात मोठे योगदान दिले होते. १९८६ मध्ये तो कप्तान झाला आणि विश्वकप खेळताना त्याने इंग्लंड विरुध्द दोन गोल केले होते. १९९१ मध्ये कोकेन सेवन केल्याच्या आरोपावरून त्याचे १५ महिन्यांसाठी निलंबन केले गेले होते. त्याने ३७ व्या वर्षी खेळातून निवृत्ती जाहीर केली होती.

२००० साली त्याने लिहिलेल्या ‘ यो सोया एल दिएगो ‘ या आत्मचरित्राला तुफान प्रसिद्धी मिळून ते बेस्टसेलर ठरले होते. त्याने प्रशिक्षक म्हणूनही दीर्घकाळ काम केले होते. तो २०१० मध्ये भारतात आला होता तेव्हा त्याने कोलकाता येथे फुटबॉल स्कूलची स्थापना केली होती.