जो बायडेन यांनी रचले दोन इतिहास

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डोनल्ड ट्रम्प यांनी हार मान्य केल्यावर आता जो बायडेन याच्या अध्यक्षपदाचा मार्ग सुकर झाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत बायडेन यांनी अमेरिकन इतिहासात दोन नव्या विक्रमांची भर घातली आहे. बायडेन यांनी विक्रमी आठ लाखहून अधिक मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली आहेच पण त्यांनी सर्वाधिक मते मिळविणारे पाहिले राष्ट्रपती असाही इतिहास रचला आहे.

विशेष म्हणजे पराभूत झालेल्या ट्रम्प यांनीही एक रेकॉर्ड नोंदविले असून सात कोटीहून अधिक मतांचा आकडा पार करणारे ते पाहिले पराभूत अध्यक्षीय उमेदवार ठरले आहेत. अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यावर मतमोजणीची सुरवात झाली आणि अजूनही काही ठिकाणची मतमोजणी सुरूच आहे. यापूर्वी अमेरिकेच्या इतिहासात ६ लाख मतांच्या फरकाने निवडणूक जिंकणारे अनेक अध्यक्ष झाले मात्र बायडेन यांनी ८ लाखाहून अधिक मतांनी ट्रम्प याना पराभूत केले आहे.

सीएनएनच्या बातमीनुसार बायडेन यांना मंगळवार पर्यंत झालेल्या मतमोजणीत ८ कोटी ११ हजार मते मिळाली होती तर ट्रम्प यांना ७ कोटी ३८ लाख मते मिळाली होती. अमेरिकन इतिहासात कोणत्याच अध्यक्षाने ७ कोटी पेक्षा जास्त मते मिळविलेली नाहीत. यंदाच्या निवडणुकीत मात्र अनेक रेकॉर्ड मोडली गेली.

बायडेन यांची नवे राष्ट्रपती म्हणून घोषणा होणे ही आता केवळ औपचारिकता उरली आहे. मतमोजणी अजून सुरु असली तरी बायडेन यांना ३०६ तर ट्रम्प यांना २३२ इलेक्टोरल व्होट मिळाली आहेत. अमेरिकेत ५३८ सिनेट असतात आणि बहुमतासाठी २७० मते लागतात.