खान’ असल्यानेच शाहरुखला बनविले ‘ब्रँड अँबेसेडर’: भाजपचा आरोप

कोलकाता: शाहरुख खान हा ‘खान’ असल्यामुळेच प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याला राज्याचा ‘ब्रँड अँबॅसेडर’ बनविले, असा आरोप राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी एका सभेत बोलताना केला. त्यांना देव किंवा सौमित्र का दिसले नाहीत, असा सवालही त्यांनी केला.

प्रचाराच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर आगपाखड करीत आहेत. भाजप हा ‘बाहेर’च्यांचा पक्ष आहे. त्याला दिल्ली आणि इतर राज्यातून आलेल्या हिंदी भाषिक नेत्यांवर अवलंबून राहावे लागते, अशी टीका तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आली होती. त्यावर आपल्या भाषणात घोष यांनी पलटवार केला.

तुम्ही भाजपाला बाहेरच्यांचा पक्ष म्हणता. तुम्हाला ब्रँड अँबेसेडर हवा होता तर देव किंवा सौमित्र चटर्जी का आठवले नाहीत? तुम्ही शाहरुखची निवड का केलीत हे म्हाला कळत नाही का? तुम्हाला निवडणुका जिंकण्यासाठी ‘खान’च हवा होता, अशा शब्दात घोष यांनी भाषणात ममता बॅनर्जी यांच्यावर टीकेचा भडीमार केला.

विख्यात अभिनेता दीपक अधिकारी ‘देव’ म्हणून ओळखले जातात. ते तृणमूल काँग्रेसचे खासदारही आहेत. सौमित्र चॅटर्जी हे बंगालमधील आदरणीय अभिनेते असून त्यांचे नुकतेच निधन झाले आहे.