आम्ही राऊतांच्या चौकशीच्या धमकीला भीक घालत नाही : प्रवीण दरेकर


वर्धा : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिली असून आम्ही शिवसेना नेते संजय राऊत यांच्या चौकशीच्या धमकीला भीक घालत नाही. भाजप अशाप्रकारे टार्गेट करण्याला जराही घाबरत नाही. कारण भाजपच्या नेत्यांचा कारभार स्पष्ट आणि स्वच्छ असल्याचे जनतेला देखील माहीत असल्यामुळे भाजपला जनाधार राहिला असल्याचा घणाघात केला आहे. दरेकर वर्ध्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीकडून काल (24 नोव्हेंबर) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी छापेमारी करण्यात आली. संजय राऊत यांनी या छापेमारीवरुन भाजपवर टीकास्त्र सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्याकडे भाजपच्या 120 नेत्यांची यादी असेल तर त्यांनी ईडीला जरूर द्यावी. त्याची चौकशी करण्याची हमी मी देतो,असे म्हटले होते. फडणवीसांच्या या वक्तव्याला राऊत यांनी उत्तर दिले.

तुम्हाला काय चौकश्या करायच्या त्या आधी करून घ्या. मग तुमच्या 120 नेत्यांची मी यादी देतो. त्यांच्याही चौकश्या होऊनच जाऊ द्या, असे आव्हानच संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिल्यानंतर आता प्रवीण दरेकर यांनी या मुद्द्यावरुन राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यादी देऊ, असे संजय राऊत यांनी बोलून चार दिवस झाले. राऊत यांना तात्काळ यादी देण्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आवाहन केले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी यादी देण्यासाठी मुहूर्त बघू नये. तात्काळ यादी देऊन टाका. उशीर करु नका नाहीतर आपण बोलघेवडे आहात, असा त्याचा समज होईल. सत्य जनतेपुढे येऊ द्या, अशी खोचक टीका दरेकर यांनी केली.

अशा प्रकारची कुठलीही कारवाई भाजप करत नाही. ईडी ही स्वायत्त संस्था असल्यामुळे ती उगाच कारवाई करत नाही. आली लहर म्हणून कारवाई केली, असे होत नाही. त्याबाबत तक्रार असेल, असं प्रवीण दरेकर म्हणाले. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार नक्कीच कोसळेल. या सरकारमध्ये संवाद नाही. सरकारमधील नेत्यांमध्ये एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. या गोष्टीचा कधीतरी अंत होईल. आतमधून हे सरकार खूप पोखरले आहे. विधान परिषदेच्या जागांचा निकाल लागेल, त्यावेळी जनतेचा कौल माहीत पडेल. अंतर्गत विसंवादातून हे सरकार कोसळेल. सरकार कोसळेल त्यावेळी भाजप सक्षम पर्याय म्हणून चांगले सरकार देऊ शकेल, असा दावा देखील प्रवीण दरेकर यांनी केला.