95 टक्के प्रभावी ठरली रशियाची स्पुतनिक-व्ही कोरोना लस; जानेवारी 2021 मध्ये सुरु होणार वितरण


मॉस्को – जगावर ओढावलेले कोरोना संकट दिवसेंदिवस अजूनच गडद होऊ लागले आहे. पण कोरोना संकटाची रोकथाम करणारे औषध अद्याप उपलब्ध झाले नसल्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष कोरोना प्रतिबंधक लस कधी याकडे लागून राहिले आहे. सध्या जगभरातील अनेक महत्वाच्या कंपन्या कोरोना प्रतिबंधक लसीवर काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या चाचण्या देखील अंतिम टप्प्यात आल्या आहेत. पण कोणत्या कोरोना लसीची किंमत काय असेल? आणि ती लस बाजारात कधी उपलब्ध होईल? असे अनेक प्रश्न लोकांच्या सध्या मनात आहेत. त्यातच आता रशियाच्या स्पुतनिक-व्ही कोरोना प्रतिबंधक लसीविषयी मोठी माहिती समोर आली आहे. स्पुतनिक-व्हीचा डोस आंतरराष्ट्रीय बाजारात 10 डॉलरपेक्षा कमी किंमतीमध्ये उपलब्ध होईल. त्याच वेळी, ही लस रशियाच्या नागरिकांसाठी विनामूल्य असेल. या लसीच्या दोन डोसची एका व्यक्तीला आवश्यकता असेल.

मंगळवारी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (RDIF) एक निवेदन प्रसिद्ध करत याबाबतची माहिती दिली. आरडीआयएफ आणि गमलेया नॅशनल सेंटर ऑफ एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी यांनी संयुक्तपणे ही लस विकसित केली आहे. क्लिनिकल ट्रायलच्या दुसर्‍या अंतरिम विश्लेषणानुसार, स्पुतनिक-व्हीचा पहिला डोस दिल्यानंतर ती 91.4 टक्के 28 दिवसांनी प्रभावी ठरली आहे. पहिल्या डोसनंतर 42 दिवसांनी लसीची कार्यक्षमता 95 टक्के प्रभावी आढळली आहे.

आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीव म्हणाले की, याच्या बेलारूस, ब्राझील, युएई आणि भारतमध्ये क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. जानेवारी 2021 मध्ये स्पुतनिक-व्ही लसीचे पहिले आंतरराष्ट्रीय वितरण सुरु होईल. यापूर्वी फायझर आणि मॉडर्ना यांनी आपली कोरोना प्रतिबंधक लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे सांगितले आहे. ऑगस्टमध्ये रशियाने स्पुतनिक-व्हीची नोंदणी केली होती. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीलाही या लसीचा डोस देण्यात आला आहे. तसेच ही लस फायझर आणि मॉडर्ना यांच्या लसीपेक्षा कमी किंमतीमध्ये उपलब्ध होईल असे सांगण्यात आहे.

दरम्यान, आतापर्यंत तीन कोरोना लसी बनविण्याचा दावा रशियाने केला आहे. स्पुतनिक-व्ही ऑगस्टमध्ये लॉन्च केल्यानंतर 14 ऑक्टोबरला EpiVacCorona ही लस आली आणि अलीकडे रशियाने कोरोनासाठी तिसरी लस तयार केल्याचा दावा केला आहे.