ईडी आणि अर्थमंत्रालयाकडे सोपवणार सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांची यादी – संजय राऊत


मुंबई – ईडी आणि अर्थमंत्रालयाकडे आपण १२० नेत्यांची यादी सोपवणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्यांनी शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल बोलताना जे मुख्य लोक महाराष्ट्रात आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान अद्याप ईडीची कोणती नोटीस आपल्याला आली नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

या सगळ्या चौकशा पूर्ण झाल्यानंतर मी ईडी आणि अर्थ मंत्रालयाकडे १२० नेत्यांची यादी पाठवतो. सत्ताधारी पक्षातील नेत्यांची नावे या यादीत आहेत. मग कोणाला ईडी नोटीस पाठवते हे पाहू, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. अनेकांनी नोटीस आली का असे मला विचारले. मी वाट पाहत असून नोटीस आली तरी आश्चर्य वाटणार नाही. माझ्यासोबतच अजित पवार किंवा अन्य कोणत्याही नेत्याला नोटीस आली तर धक्का बसणार नाही. कारण सध्या २० वर्ष जुनी थडगी उकरण्याचे काम सुरु असल्याचे मला कळले आहे. त्यासाठी आम्हीदेखील तयार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

इतर काही काम देशात नसेल. लोक घोटाळा करुन देशाबाहेर पळत आहेत. ज्या लोकांची संपत्ती एका वर्षात वाढत आहे त्यांची चौकशी ईडी करणार नाही. पण महाराष्ट्रातील जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणी मला नोटीस देण्याबद्दल बोलत असेल तर येऊ देत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात हे सूडाचे राजकारण चालणार नाही. तुम्ही आज पत्ते पिसत आहात, आम्ही उद्या डाव उलटवू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी आपला काही संबंध नसल्याचा खुलासा प्रताप सरनाईक यांनी केला आहे. मराठी माणसाने उद्योग करणे, महाराष्ट्रात व्यापार करणे हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने व्यापार करु नये आणि जर करणार असाल तर ईडीच्या, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपवून टाकू हे धोरण कोणी राबवत असेल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

काही चुकीचे फडणवीसांनी केले नसेल तर घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. राऊत यासंबंधी बोलताना म्हणाले की, कोणी चौकशीला घाबरत नाही. तुम्ही आता चौकशांना घाबरले पाहिजे. महाराष्ट्रातसुद्धा सत्ता आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत हे विसरु नका. तेव्हा चौकशांना कोण घाबरत आहे लवकरच कळेल.