पाकिस्तानात बलात्कार करणाऱ्याला होणार नपुंसकत्वाची शिक्षा


इस्लामाबाद – जगभरातील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याची माहिती वारंवार समोर येत आहेत. पाकिस्तान सरकारने याच दरम्यान मोठा निर्णय घेतला असून पाकिस्तान सरकार बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी नवीन कायदा आणणार असून त्याच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली आहे. या कायद्यात बलात्कार प्रकरणातील दोषीला इंजेक्शन देऊन नपुंसक करण्याची शिक्षा असणार आहे. इम्रान खान यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत या कायद्याला मंजुरी देण्यासाठी सहमती दर्शवल्याची माहिती मिळत आहे.

यासंदर्भातील वृत्त पाकिस्तानमधील जिओ टीव्हीने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या कायद्याचा मसुदा कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला. या कायद्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. या मसुद्याला इम्रान खान यांनी मंजुरी दिल्याचे म्हटले आहे. पण सरकारकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. पंतप्रधान इम्रान खान यांनी काही महिन्यांपूर्वीच अशा कायद्याची गरज असल्याचे नमूद केले होते.

बलात्कार आणि लैंगिक अत्याचारातील दोषींना घेऊन एक ग्रेडिंग सिस्टीम तयार करायला हवी. कठोर शिक्षा द्यायला हवी. जेणेकरून दोषी पुढील वेळी असे कृत्य करण्यासाठीच सक्षम राहणार नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले होते. बांगलादेश सरकारने असाच मोठा निर्णय याआधी घेतला आहे. सरकारने मंत्रिमंडळात बलात्कार प्रकरणात अधिकतम जन्मठेपेची शिक्षा वाढवून मृत्यूदंड करण्यासाठी मंजुरी दिली आहे.